घोणदांड-खडसांबळे लेणी-सुधागड-नाणंदांड
जय श्रीराम
डोंगरांच्यात हरवलो मी..
कधी काळ चे महापुरुष हे..
आजानू बाहूच जणू..
केवढा तो पसारा
आजानू बाहूच जणू..
केवढा तो पसारा
केवढी ती उंची..
केवढा तो आधार..
केवढे ते कर्तृत्व..
केवढे ते रंग..
त्या रंगात रमलो मी..
त्या रंगात रमलो मी..
डोंगरांच्यात हरवलो मी..
सह्याद्रीच्या पहाडां मध्ये दोन दिवस हरवायलाच जणू आमचा चमू बाहेर पडला होता!
नेहमी प्रमाणे तुषार ने दमदार प्लॅन केला होता. घनगड किल्ल्याच्या इथल्या दोन घाटवाटा, सुधागड सारखा महत्वाचा किल्ला आणि खडसांबळे लेणी असा ट्रेक प्लॅन होता . घनगड हा किल्ला लोणावळ्याच्या दक्षिणेला साधारण ४० कमी अंतरावर आहे.एकोले हे पायथ्याचे गाव. आम्ही मागच्या वर्षी २०१७ मध्ये घनगड शेजारच्या केवणी पठाराच्या इथला नळीची वाट आणि डेऱ्या घाट हा ट्रेक केला होताच, तेव्हाच केवणीच्या बाकीच्या दोन घाट वाटा पण करूयात अस ठरल होत.
तुषार नि त्याला सुधागड ची पण जोड दिल्या मुले प्रकरण जरा जास्त भारदस्त झाल होत हे मात्र नक्की. या ट्रेक ची सगळ्यात मोठी खास बात म्हणजे आमच्या पुणे ट्रेक ग्रुप चे ३ musketeers डॉक्टर श्रीकांत ओक उर्फ श्रीकांत दादा, हर्डीकर काका आणि आठवले काका असे तिघे वय वर्ष ६० उलटून गेलेले तरुण बरेच दिवसांनी एकत्र येणार होते.
शुक्रवारी रात्री बरोबर ११ वाजता आमचा कबिला एकोले गावाकडे निघाला.सुस मार्गे, लोणावळा, पेठ शहापूर, सालतर अस प्रवास करत रात्री २.३० वाजता आम्ही एकोले गावाच्या मारुती मंदिरात दाखल झालो.
नोव्हेंबर संपत आल्या मुळे थंडी बऱ्या पैकी होती. आम्ही १४ जण होतो त्या मुळे जरा दाटी वाटीनेच मंदिरात निद्रिस्त झालॊ. का कोण जाणे पण मला काही रात्र भर झोप लागली नाही.एक तर मंदिरात रात्र भर गार वारं वाहत होत, त्यात माझा शुक्रवार सकाळ पासूनच पाय दुखत होता.सकाळी walk ला गेलं असताना मुरगळला होता.
त्या मुळे शनिवारी सकाळी आमचा चमू कूच करायला तयार झाला तरी मी आपलं ट्रेक ला बाहेर पडायच का परत पुण्याला यायच याच विचारात. कारण पल्ला लांबचा होता आणि आपल्या मुळे बाकीच्यांना त्रास नको हा मुख्य उद्देश.
पण ट्रेक ला जाण्याची जबर इचछा शक्ती पण होतीच , कारण खास श्रीकांत दादा ट्रेक साठी इंदोर हुन आलेला, त्यात असा दमदार बेत ठरलेला , माघार घेणं शक्य नव्हत............आणि नेमक अश्या वेळी आमच्या ग्रुप चे सर ..मुकुंद पाटे त्यांच फेमस वाक्य बोलून गेल,
" Amit focus on the trek and not on the pain "
बस.. एक्दम जादू सारखा माझा mindset change झाला..मी म्हंटल कि जाऊ तर यांच्या बरोबर , नाही जमलं, पाय खूपच दुखला तर केवणी हुन परत येऊ फार तर. आम्ही एकोले गावात लहू कडू कडे सकाळचा नाश्ता उरकला आणि झरू ढेबे मामांना वाटाड्या म्हणून बरोबर घेऊन एकोले गावाच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो.
सकाळचे गारेगार वातावरण असल्या मुले सगळेच तुफान वेगाने निघाले.. आम्ही एकोले गावातली शेतं मागे टाकली आणि घनगड च्या मागच्या माळावर आलो.. उजवी कडे तैल बैल च्या जुळ्या भिंती आणि सालतर चा अवाढव्य डोंगर उन्हात तळपत होते.
पूर्ण माळ आता सोनेरी गवताने भरला होता.. चालण्याचा ताळ मेळ सुरवातीलाच मस्त जुळून आला होता.
त्या मुळे घनगड चे पठार आणि केवणी पठार यांना जोडणाऱ्या जिमखोड्याच्या खिंडीत आम्ही ४५ मिनिटातच दाखल झालो..
डोंगरयात्रा कव्हर पेज style पोझेस देऊन मजबूत फोटू सेशन झाले.. आणि आम्ही बरोबर ८.३० वाजता केवणी पठारवरच्या एकमेव घर असलेल्या ढेबे मामांच्या सुंदर घरी पोहोचलो.
मामा आणि मामी दोघेही शेतीच्या कामात व्यस्त होते..पण तरीही नेहमी प्रमाणे आमचे ताक आणि पाण्याने स्वागत झाल. इतक्या अवाढव्य पठारावर हे दोघं म्हातारा म्हातारी मोठ्या हिमतीनं आपल्या टुमदार घरात अजूनही वास्तव्य करून आहेत. बाकीच सगळं गाव इथून एकोल्याला स्थलांतरित झाल. मामांचा मुलगा वाशीला असतो.
माझा पाय दुखत होताच, पण मी त्या कडे दुर्लक्ष करून ट्रेक चा आस्वाद घ्याच मनोमन ठरवून टाकलं होत. ढेबे मामा मामी गव्हाच पीक सारख करून मोजणीच काम करत होते. थोड्या वेळ त्यांच्या इथे विसावलो आणि आम्ही घोंडदांड कडे निघालो.मामांच्या घरा मागून शाळेला डावी कडे ठेवून सरळ दक्षिण दिशा ठेवून पठाराच्या डाव्या अंगाच्या पाय वाटेने चालायला लागलो. साधारण २५ मिनिटे चालल्यावर घोंडदांड चा उतार सुरु झाला.
केवणी हुन घोंडदांड घाटाने खडसांबळे गाव हा साधारण ६०० मीटर चा उत्तर आहे.
सुरवातीला गवतातून सौम्य उतरत वाट एकदम जंगलात झाडीत शिरली. आता मात्र उतार चांगलाच तीव्र होता, घसारा आणि तीव्र उतरंड अश्या दुहेरी शस्त्रांनी घोंडदांड आमची परीक्षा बघत होती.वाट आधी डावी कडे उतरत गेली आणि मग परत उजवी कडे अस डोंगराच्या दांडावरून खालच्या पदरात घेऊन जाते, थोड खाली आल्यावर वाट परत घनगड आणि मारताना डोंगराच्या कडे तोंड करून दरीच्या दिशेला वळली , आता मात्र छान सावली आणि गार कातळाला बिलगून वाट उतरत होती. साधारण १.३० तास उतरल्यावर आम्ही खालच्या पदरात दाखल झालो.
समोरच खडसांबळे लेणी स्पष्ट पणे डोंगरात वरच्या अंगाला साधारण ३०० फुटावर दिसत होती. आम्हाला लेण्यांपर्यंत पोचायला अजून अर्धा तास गेला. आमच्या सॅक्स खालीच ठेवून आम्ही सगळे वर चढलो.
खडसांबळ्याच्या लेण्यांना नेणवलीची लेणी पण म्हणतात. साधारण ३० एक गर्भ ग्रिह आहेत या लेण्यां मध्ये. ही लेणी साधारण इ स पूर्व १०० वर्षे आधी कोरली गेली असावीत. मुख्य लेण्याच्या मधोमध एक स्तूप आहे आणि ध्यानधारणे साठी बसायला केलेले चौथरे आहेत. लेण्यां मध्ये ठाणाळे किव्हा अन्य लेण्यांच्या तुलनेने नक्षीकाम किव्हा अन्य कोरीव काम मात्र नाही. या वरून या लेण्यांचा खूप काळ उपयोग बहुदा केलेला नसावा.
आता ऊन जाणवायला लागल होता.खडसांबळे लेणी मागे टाकली की वाट सरळ सह्याद्रीच्या मुख रांगेला म्हणजेच केवणी पठाराला उजवी कडे ठेवून झपाट्याने खालच्या पदरातून कोकणात खडसांबळे गावाकडे घेऊन जाते. आम्हाला वाटेत एका घळीत एक सुंदर पाणवठा लागला. घळ सरळ वर केवणी पठाराच्या थोड्या खालून सुरु झाली होती. भरपूर झाडी होती, त्या मुळे अर्थातच घळीतून वाहणार पाणीही गार होत. आम्ही सगळ्यांनीच भरपूर पाणी पिऊन घेतल आणि आमच्या पाण पिशव्या भरून घेतल्या. हे पाणी साधारण जानेवारी च्या अखेर पर्यंत टिकत असेल.
वाटेत उजवी कडे नळीच्या वाटेची घळ खुणावते. नळीची वाट ही घाटावर जायला अजूनही गावकरी वापरतात. ही तुलनेनी सगळ्यात झपाट्याने वर चढणारी आणि पावसाळा सोडला तर बऱ्या पैकी सोपी असलेली वाट.
पाणी पिऊन आम्ही परत ताजे तवाने झालो आणि थेट खाली कोकणात खंडसांबळे गाठले. दुपारचे २ वाजले होते. ऊन खूप असल्या मुळे जवळ चे पाणी जपून वापरावे लागत होते. आमचे बाकीचे भिडू पुढे नदीकडे गेले. मी मात्र गावात एका घरी शांत पणे ओट्यावर बसलो. घरातल्या मामा आणि मामींनी माझी प्रेमाने विचार पूस केली. तिकडे मस्त २ तांब्या भर पाणी प्यायलो. आमचा ग्रुप गावा बाहेर नदीच्या किनारी एका उंचवट्यावर जेवणासाठी थांबला होता.
नदी चे पाणी मात्र फारसे चांगले नव्हते. त्या मुळे गावात थांबून पाणी प्यायचा माझा निर्णय अगदी योग्य होता. सकाळी ७ वाजल्या पासून पायपीट केल्या मुळे सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडत होते.आम्ही सगळ्यांनी पराठे, ठेपले, पोळी भाजी, गुळपोळी अश्या विविध पदार्थांवर ताव मारला.
आम्ही जिथे जेवायला थांबलो होतो तिकडे बऱ्या पैकी गवत आणि टोचणारी झाडे होती.. पण सर्वां वरच निद्रादेवी पूर्ण पणे हावी झाल्या मुळे तश्याही परिस्थितीत सगळ्यांनी थोड्या वेळ वाम कुक्षी घेतली.
साधारण दुपारी ३ वाजले होते. आम्हाला पुढल्या टेकडी वर ठाकूरवाडी जाणवत होती. सुधागड च्या पायथ्याची ही वाडी मात्र कोकणातल्या बाकीच्या वाड्या वस्त्यांच्या तुलनेने अस्वच्छ आणि तितकीशी मनाला भावत नाही.
त्या मुळेच आम्ही तडक सुधागडाकडं निघालो. पश्चिमेला सूर्याची तीव्रता जाणवत होती. त्यात कोकणातून चढत असल्या मुळे चांगलाच उष्मा जाणवत होता.
साधारण ५. वाजता आम्ही गडाच्या पाहिऱ्यांच्या वाटे पाशी पोचलो. सुधागड च्या उभ्या पाहिऱ्यांच्या वाटेने सगळ्यांचाच कस पहिला. नेटाने चढत आम्ही शेवटी एकदाचा अंधाराच्या आत गडाचा माथा गाठला. आमचे आजचे राहायचे ठिकाण मात्र गडाच्या उत्तर पूर्वेला पंत सचिवांच्या सरकार वाड्यात होते.
तिथं पर्यंत पोहचायला अजून ३० मिन्टाची चाल होती. शेवटी आम्ही सगळे एकदाचे बरोबर १२ तासांनी सुधागडाच्या वाड्यात दाखल झालो.वाड्यात सॅक्स उतरवून सगळ्यांनी न कंटाळता स्ट्रेचेस केले. त्या मुळे पाय आणि अंग एकदम मोकळ झाल.
कोकणातून सुधागडाची उंची आहे ६१९ मीटर , म्हणजे लोणावळा एवढी उंची. त्यामुळे आमची दमछाक नसती झाली तर नवल. सुधागडाची मुख्य राज वाट उत्तर पायथ्याच्या धोंडसे गावाकडून येते. धोंडसे गावा पर्यंत अष्टविनायक पाली हुन ST ची बस सेवा आहे. ह्या पाहिऱ्यांच्या राज मार्गाने वर आले की सुधागडाचा महा दरवाजा आहे. थोडस खाली तानाजी टाके पण बघण्यासारखे आहे.
गडावर अजूनही वस्ती आहे. भोराई देवी मंदिराचे गुरव आणि काही धनगर कुटुंबे गडावर अजूनही वस्तीला आहेत. आमच्या कडचा शिधा गडावरच्याच एका मावशीनं कडे देऊन त्यांना खिचडी करायची विनंती केली.
खिचडी होइस तोवर आम्ही काही जण गडावरच्या पूर्वे कडच्या पाण्याच्या टाक्यांच्या कडे पाणी आणायला गेलो. सुधागडावर पाण्याची टाकी असा दिशादर्शक फलक लावलेला असला तरी ही टाकी लगेच सापडत नाहीत आणि थोड खालच्या अंगाला उतरत जाऊन शोधावी लागतात. टाक्यांच्या वाटेवर झाडी आहे, त्या मुळे रात्री थोडे सावध पणे जावे लागते. पाणी मात्र अतिशय मधुर आणि पिण्या योग्य आहे.
रात्रीचे जेवण उरकून ९ वाजता मी सलिपींग बॅग मध्ये गुडूप झालो. आदल्या रात्रीची ना झालेली झोप आणि दिवस भाराच्या तंगड तोडीने मला एक मिनटात झोप लागली. बाकीची मंडळी तारे/तारकांचा अभ्यास आणि गप्पा गोष्टी करत बऱ्याच वेळ जागी होती.
मी मात्र त्या शांत वाड्यात एकदम गाड झोपेत गेलो. सकाळी ५ ला आपणुन जाग आली, याचा अर्थ शरीराला व्यवस्थित विश्रांती मिळाली होती आणि नव्या दिवसाच्या आव्हानांना सामोरे जायला मी पूर्ण तयार होतो. पायाचे दुखणे पण आता आश्चर्य कारक रित्या कमी झाले होते.
सकाळचे प्रातःर्विधी उरकून आम्ही सगळे भोराई,महादेव आणि हनुमान मंदिर कडे गेलो. भोराई देवीचे मंदिर बघण्या सारखे आहे. या मंदिराचे बांधकाम पंत सचिवांनी १७५० साली केले. मंदिराच्या समोर दीप माळ आहे, आणि गाभाऱ्यात भोराई देवी ची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिराच्या मागे समाधीचे अवशेष आहेत. मंदिरात एक लाकडी वाघाची मूर्ती आहे. भोराई देवी मंदिरा जवळच शिव मंदिर आहे आणि हनुमान मंदिर आहे. ह्या समोरची पाय वाट आपल्याला खाली गडाच्या महादरवाज्या पाशी घेऊन जाते. बरेच खाली उतरत जावे लागते.
भोराई देवी मंदिरासमोर गडाचा विस्तृत माथा आहे.इथून समोर तैल बैल आणि घनगड/मारताना चे नेत्रदीपक द्रिश्य दिसत होते. सूर्योदय च्या पार्श्वभूमी वर संपूर्ण सह्याद्री दुर्ग मंडळ सोनेरी किरणांनी उजळले होते. बऱ्याच वेळ आम्ही सगळे मस्त तैल बैल आणि सुधागड मधल्या दरी कडे तोंड करून शांत पणे बसलो होतो. समोरच्या तैल बैल पठारावरून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णी आणि वाघजाई घाट वाटा स्पष्ट दिसत होत्या. आम्ही मागच्या वर्षी च्या पावसाळ्यात ह्या दोन्ही वाटा केल्या होत्या आणि ठाणाळे लेणी पण बघितली होती.
मधल्या दरीतील जंगल खुणावत होत. हा भाग अजूनही चांगलच जंगल टिकवून आहे. अश्या जागां मध्ये एक वेगळीच जादू असते. तिथला निसर्ग आपल्याला अंतर्मुख करतो आणि एका अर्थाने आशीर्वाद देतो आणि आपल्याशी हळूच सवांद साधतो..मनात विचार यायला लागतात..
"जस दर्या खोऱ्यातून भटकताना कधी काटे बोचतात, तहानेने जीव व्याकुळ होतो, समोरचा चढ आणि शिखर बघून मनावर दडपण येते, पण................
अश्या वेळी जर आपण जिद्दीने चालत राहिलो, चांगले सवंगडी बरोबर असले ,कीं आव्हानांना तोंड द्यायची शक्ती तो सह्याद्री माय बाप आपल्याला आपसूक देतो. एक्दम एक पाणवठा समोर येतो,एक गार वाऱ्याची झुळूक आपल्या घामावर फुंकर मारते, एखादा सुंदर पक्षी साद घालतो, गर्द रान वाट आपल्याला मंत्रमुघ्द करते"..........
तसेच जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात, किव्हा एखादे अवघड आव्हान सामोरे येते, तेव्हा आपण खंबीर पणे सामोरे जायला हवे ,स्वतः वर विश्वास ठेवून,हिम्मत आणि कष्ट करायला हवे, काहीही झाले तरी झगडून,प्रयत्न करत राहायला हवे. आयुष्यात यशस्वी होणे म्हणजे तुमच्या कडे किती गाड्या आणि घर आणि पैसे आहेत या वर ठरत नाही, तर तुम्ही कसा विचार करता, तुमचे आचरण कसे आहे, तुम्ही कठीण प्रसंगी कसे स्वतःचा संयम राखता, दुसऱ्याच्या उपयोगी पडता आणि न डगमगता आलेल्याला आव्हानांवर मात करता या वरून ठरतं.
अश्या सगळ्या विचारात असताना एक्दम चला रे म्हणून प्रशांत ने हाक मारली आणि मी भानावर आलो. खरंच ती सुधागड ची पहाट कधीच ना विसरता येण्या जोगी होती. बरोबर ८ वाजता आम्ही गड उतरायला लागलो.
१.३० तासात आम्ही गड उतरून पायथ्याच्या ठाकूवाडीत पोचलो. ठाकूरवाडी ला एका घराच्या ओसरीत मस्त चहा आणि बिस्कीट घेऊन, थोड्या गप्पा मारून आम्ही निघालो.
ठाकूरवाडीतून खाली नदी पात्रात उतरायला अजून ३० मिनिटं गेली आणि आम्ही साधारण १० वाजता नदी पात्रा जवळच्या धनगरवाड्याशी पोहचलो.
झरू ढेबे मामांचे हे नातलग होते. वाटेत नदी पात्रावर आम्ही मस्त थोडासा ब्रेक घेतला. सुंदर नितळ पाणी वाहत होत आणि आम्ही सगळ्यांनीच घाट चढणीला लागायच्या आधी चेहऱ्यावर पाणी मारून शरीर जरा थंड केल आणि भरपूर पाणी पिऊन घेतले.
नदी पात्रातून पलीकडे वरच्या पदरात पोहोचायला आम्हाला २० मिनिटे लागली.इथून वाट उत्तरे कडे तैल बैल आणि केवणी च्या दरी च्या दिशेने जायला लागली. पदरातून वाट उजवी कडे वळून आता थेट केवणी च्या डोंगराला भिडली. नाणदांड घाटाची मुख्य चढाई इथून सुरु झाली. गर्द जंगलातून वाट वर चढत गेली.
निरव शांततेला फक्त पानांचा आवाजच काय तो भेदत होता. चढाई बऱ्या पैकी कस बघणारी होती,पण आमचे तिन्ही ६० वर्षाच्या वरचे Musketeers जोमाने घाट चढत होते. त्यांना बघून अंगात अजुन उत्साह संचारत होता.
सतत दीड तास चढल्यावर आम्ही सुकलेल्या ओढ्या पाशी आलो. अजूनही तिथे थोडे पाणी रेंगाळले होते, आमचे पाटे सर तिथल्या एका डबक्यात लगबगीने पाणी पिण्या करता सरसावले आणि पाण्यात पडले. डबकं अर्धा फूट खोल असल्या ने नुसतेच बुचकळले गेले :-)
ओढ्यावर आम्ही जरा दम खाल्ला, कारण अजून पुढची हजार फुटी उभी चढाई बाकी होती. पुढची चढाई ओढ्याच्या डाव्या अंगाने वर चढाला लागली. आता उभा चढ होता. सुकलेल्या गवतातून पाय रोवून चढावे लागत होते. चढ़ छातीवरचा असून सुद्धा आम्हाला छान लय सापडली होती. दोन दिवसाच्या चालीने आमच एंजिन चांगलंच तापल होता.
चढताना वाटेत दर १५ मिनिटांनी आम्ही फ्रुट ब्रेक घेत होतो. संजय आम्हाला प्रत्येकाला फळ कापून,मीठ वगैरे घालून खायला घालत होता. त्या मुळे या अवघड टप्यांवर खूप शक्ती मिळत होती.
माथा १५० फूट राहिला असताना एक्दम एक आडवी जाणारी निमुळती वाट लागली. उजवी कडे कातळकडा आणि डावी कडे खोलदरी अश्या वाटेनी १० मिनिटं चालत, पुढची वाट आम्हाला झपाट्याने घाट माथ्यावर घेऊन गेली. माथ्यावर गेल्यावर संजयनच पुन्हा सगळ्यांना पेठा खाऊ घातला. संजूभाऊ हा आमच्या ग्रुप चा चॉकलेटे हिरो कम मॅचो मॅन दोन्ही आहे.
माथ्यावरून समोर पुन्हा एकदा सुधागडचे प्रेक्षणीय दर्शन घडल.आम्हाला नाण दांड घाट चढायला बरोबर २ तास लागले होते.
आम्ही थोडेसे खाऊन घेतले, कारण अजून दीड तासाची चाल बाकी होती. आम्ही केवणी पठार ओलांडून पुन्हा एकदा जिमखोड्याच्या खिंडीतून घनगडाच्या मुख्य पठाराला येऊन मिळालो. एकोले गाव काही येता येईना. पूर्ण दोन दिवसांच्या भटकंतीतीत झरू ढेबे मामा बऱ्या पैकी अलिप्त आणि शांत होते. त्यांना जरा बोलत केल. मामा गावात एकटेच राहतात. मुलं पुण्याला आहेत. मामा एरवी शेती करतात. या भागाची उत्तम माहिती असणारे वाटाडे आहेत ते. आम्ही तशीच रपेट मारत दुपारी २. ३० वाजता एकोले गाव गाठले.
एकल्याला एक भलतीच बातमी आमची वाट पाहत होती. आमच्या दोन्ही गाड्यांच्या काचा फोडून चोरी झाली होती. माझे आदिदास चे जाकीट आणि संजय चे wallet चोरांनी नेले होते. इतक्या दिवसात सह्याद्रीत आम्हाला आलेला हा एकमेव वाईट अनुभव. गावातल्या लोकांना याची कल्पना होती किंव्हा नव्हती ते माहित नाही पण आमच्या गाड्या गावातच पार्क केल्या होत्या , त्या मुळे हे गावातल्याच किव्हा जवळ पास च्या कोणाचे काम असणार हे नक्की. आम्ही येताना पिरंगुट पोलीस स्टेशन मध्ये complaint दाखल करून परत पुण्यात रात्री ९ वाजता पोहोचलो.
अश्या रीतीने एक सर्वांग सुंदर डोंगरयात्रा पार पडली. चोरी मुळे जरा विपरीत घडले, पण आम्ही सगळ्यांनीच काय गमावले या पेक्षा या दोन दिवसांत आम्ही काय कमावले याचा विचार समोर ठेवला. सह्याद्री आपल्याला नेहमीच हा सकारात्मक द्रीष्टीकोन देतो. या पुढे ट्रेक दरम्यान काय काळजी घ्यायची याची शिकवण पण आम्ही विसरलो नक्कीच नाहीयोत.
फोटो क्रेडिट: क्रांतिवीर, मुकुंद पाटे सर, प्रशांत,संजय आणि माझे सगळेच ट्रेक मित्र.
ट्रेक दरम्यान पाळायच्या काही महत्वाच्या सूचना :
१.). हा किव्हा कुठलाही ट्रेक करण्या पूर्वी नियमित व्यायाम करा.
२). ट्रेक दरम्यान कुठेही कचरा करू नका, कचरा परत घरी आणा .
३). जंगलात एकटेच जाऊ नका, ग्रुप बरोबर राहा.
४).ट्रेक दरम्यान पाण्याचं नियोजन काटेकोर पणे करा, ३ लिटर पाणी बरोबर नेहमी असू द्या.
५). आपल्या बरोबर घेतलेल्या स्थानिक लोकांचा आदर करा व त्यांना आपल्या कडचे अन्न आणि पाणी अवश्य द्या.
६). आपण जातोय त्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि भोंवगोलिक महत्व जाणून घेऊन जर डोंगर यात्रा केलीत तर ती जास्त योग्य ठरेल.
मस्त रे दाद्या, इंग्रजीत आणि मराठीत पण लिहितं झालास की... आवडलं आपल्याला... आम्ही सह्यांकनला केला होता काही रूट यातला... लेण्यांच्या वाटेवर असलेले दगड आणि लेण्यांच्या आत असलेले प्रचंड डास आठवले मला ...छान लिखाण आणि फोटू पण...👍👌💐
ReplyDeleteदादू हा पूर्ण route भारीच आहे, अगदी परिपूर्ण आनंद देणारा आणि आधुनिक दुनिये पासून अजूनही फारकत घेऊन असलेला
Deleteछान!!!वाचताना माझीही भ्रमंती झाली...सुरेख लिहिलंय सोबत pics असल्यामुळे तर आणखी फिरण्याचा आनंद घेता आला.🙌👍
ReplyDeleteThank you.
Deleteकिती सुंदर लिहिले आहेस अमित, मजा आली वाचताना. असच लिहित रहा मित्रा.☺️
ReplyDeleteधन्यवाद मुकुंद, लवकरच एकत्र ट्रेक करूयात आता कोरोना ची साथ ओसरल्या वर.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteझरू ढेबे मामा cha number milu shakel ka ?
Deleteamhala Ghangad te Sudhagad ani Sudhagad te TailBaila ashi mohim karaychi aahe